सावधान ! कारचा AC तुमचा जीव घेऊ शकतो, कधी ठरतो धोकादायक समजून घ्या?
काही वेळा आपण कोणासोबत कामानिमित्त बाहेर जातो. सोबतच्या व्यक्तीचं काम लवकर पूर्ण होत नसेल व तिथे बसण्याची सुविधा नसेल, तर आपण कारमध्येच एसी चालू करून बसतो. कधी कधी बोअर झालं, तर कारमध्ये झोपही लागू शकते; पण उभ्या कारमध्ये एसी चालू ठेवून झोपणं जिवावर बेतू शकतं.
राजधानी डेहराडूनमध्ये अशीच एक घटना घडली. एसी गॅस व टेम्परेचरमुळे कारमधल्या दोघांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा कारचं इंजिन चालू होतं. या दोघांचा मृत्यू कारमध्ये रात्रभर एसी ऑन राहिल्याने झाला. त्यामुळे अशी चूक करू नये.
उभ्या कारमध्ये एसी चालवल्याने जीव जाण्याचा धोका
कार एक्सपर्ट्सच्या मते, उभ्या कारमध्ये एसी चालू केल्यावर त्यातून येणारे गॅसेस हळूहळू माणसाच्या शरीरात जाऊ लागतात. अशा परिस्थितीत, जर व्यक्ती कारमध्ये झोपत असेल तर तिच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे हे तिला कळत नाही.
शरीरात कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण जास्त झाल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, काही वेळा श्वास गुदमरून मृत्यूही होऊ शकतो. एसीमुळे कार आतून खूप जास्त थंड होते आणि इंजिन खूप गरम होऊ लागते. त्यामुळे एसी जास्त चालवल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. आता अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, ते जाणून घेऊ या.
बचावाचे उपाय जाणून घ्या
उभ्या कारमध्ये एसी लावण्याची खूप गरज वाटत असेल, तर सर्वांत आधी कारची खिडकी थोडीशी खाली करा. असं केल्याने ऑक्सिजन आत येईल आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर जाईल. यामुळे कारमध्ये बसलेल्यांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही आणि सुरक्षित वाटेल.
बंद कारमध्ये झोपू नका
काही जण कार पूर्णपणे बंद करून आत झोपतात, अशा खूप घटना घडतात. हे खूप धोकादायक असल्याचं सिद्ध झालंय. काही जण अनेक तास एसी चालू ठेवून कारमध्ये झोपतात. असं करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. गाडीत झोपायचं असेल तर काचा खाली करून झोपता येतं. तसंच बंद कारमध्ये एक्झॉस्ट फॅन नेहमी चालू ठेवावा. कारचा रेडिएटर, इंजिन आणि एक्झॉस्ट फॅन यांचं नियमितपणे सर्व्हिसिंग केलं पाहिजे. उन्हाळ्यात बंद कारमध्ये एसी चालू असताना कार्बन मोनॉऑक्साइड गॅस इंजिनमधून जातो आणि तो विषारी बनतो. तो शरीरासाठी धोकादायक असतो.